Mah Tech Board Re Exam महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ सत्रातील परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते किंवा जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विशेष सूचनेनंतर मंडळाने या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमकी काय आहे ही घटना?
या वर्षीच्या जुलै २०२५ सत्रात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने AI आधारित Proctored तंत्रज्ञान वापरून MCQ स्वरूपात परीक्षा घेतली होती. ७ जुलै रोजी परीक्षा संपल्यानंतर १७ जुलैला निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत एकूण ३६,२०१ विद्यार्थी बसले होते.
यापैकी २,१५२ विद्यार्थ्यांचे निकाल परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे राखून ठेवण्यात आले होते. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला आणि मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश दिले.
२३ ऑगस्टला होणार फेर परीक्षा
मंडळाने आता या राखीव निकाल असलेल्या आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी २३ ऑगस्ट २०२५ रोजी पुरवणी परीक्षा आयोजित केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही आणि त्यांना पुन्हा संधी मिळेल.
यापूर्वी मंडळाच्या परीक्षा पारंपरिक पद्धतीने होत असत आणि त्यांचा निकाल लागायला दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागत होता. विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा म्हणून मंडळाने AI Proctored तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला होता. या नव्या तंत्रज्ञानाने परीक्षा प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी असून, त्यांना आता अधिक तयारी करून परीक्षेला सामोरे जावे लागेल.
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://msbte.ac.in/

